गोर बंजारा साहित्याचे चालते बोलते विद्यापीठ - भीमणीपुत्र काका !

◆ डॉ. सुभाष राठोड, पुणे
गोरबंजारा साहित्यातील एक गाजलेले नाव म्हणजे भीमणीपुत्र तथा मोहन गणुजी नाईक यांचा आज ७४ वा वाढदिवस, त्यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा ! वाढदिवसानिमित्त त्यांच्या साहित्यिक कार्यावर संक्षिप्त स्वरूपात टाकलेला प्रकाश !
गोर बंजारा साहित्याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे 'भीमणीपुत्र काका !' गोर बंजारा साहित्याचे ऊर्जास्रोत, गोरमाटी साहित्य सारस्वतातील प्रथितयश लेखक म्हणून ज्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते, असे आदरणीय *'भीमणीपुत्र काका ' यांचे नाव भारतात गोरबंजारा साहित्य क्षेत्रात ज्याला माहीत नाही असा माणूस सापडणे विरळाच म्हणावा लागेल !
गोर बंजारा तथा गोरमाटी बोलीभाषेच्या अस्मितेविषयी आत्मभान जागृत करण्याचे सर्वांत मौलिक कार्य जर कोणी केले असेल तर निर्विवादपणे ' भीमणीपुत्र काकांचे नाव आपल्याला आवर्जून घ्यावे लागेल ! गोर बंजारा साहित्याला नवनवे अस्सल गोरमाटी शब्द जर कोणी दिले असतील तर ते आदरणीय भीमणीपुत्र बापूंनीच ! गोरमाटी संस्कृतीचे निस्सीम उपासक म्हणून बापुंचा आपणास उल्लेख करावा लागेल ! त्यांचे वास्तवातील नाव मोहन गणुजी नाईक परंतु आपल्या जन्मदात्रीचा आदर म्हणून त्यांनी आपल्या साहित्य लेखणीला *'भीमणीपुत्र'* असे नाव दिले. यामागे खरोखरच त्यांचा उदात्त हेतू दिसून येतो..
'गोरमाटी संस्कृती आणि संकेत' या पुस्तक लेखनाने त्यांनी आपल्या साहित्य कारकिर्दीचा प्रारंभ केला ! त्यानंतर भीमणीपुत्र काकांनी एकापेक्षा एक सरस, मौल्यवान, सुंदर अशा साहित्य कलाकृतीची निर्मिती केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 'दमाळ', 'क्रांतीसिंह तोडावाळो', 'केसूला', 'मारोणी', 'नसाबी', 'गोरपान', 'लावंण पिवशी', 'वाते मुंगा मोलारी' - भाग १ व २, 'गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन' इत्यादी.
'गोरपान' या ग्रंथानंतर अलीकडेच गोरमाटी बोलीभाषेसंबंधी प्रकाशित झालेला त्यांचा एक अजोड भाषाशास्त्रीय ग्रंथ म्हणजे ' गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन' हा होय. हा ग्रंथ नवलेखक, संशोधक व वाचकांच्या दृष्टीने एक दिशादर्शक, मार्गदर्शक ठरेल यात यत्किंचितही शंका नाही ! त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज त्यांचा जन्मदिवस ' गोरमाटी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा होत आहे. हा त्यांच्या साहित्य सेवेचा सर्वोच्च गौरव म्हणावा लागेल ! त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज गोर-बंजारा साहित्यविषयक आपल्या काही लेखक मंडळींच्या पुस्तकांचे प्रकाशन होत आहे, ही अतिशय गौरवपूर्ण व अभिनंदनीय बाब आहे. सर्व लेखक मित्रांचे हार्दिक अभिनंदन व पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी हार्दिक शुभेच्छा !
याशिवाय भीमणीपुत्र काका हे सोशल मीडियावर सुद्धा सातत्याने लिखाण करीत आहेत. त्यांची सोशल मीडियावरील अनेक सदरे लोकप्रिय ठरली आहेत. उदा. 'वाते मुंगा मोलारी', 'आनवाल', 'चालतू छेडा 'थु: पेल', 'काकडवांदा' इत्यादी. त्याचबरोबर प्रासंगिक विषयांवरही ते सातत्याने लिखाण करीत असतात. त्यांच्या या सर्व लिखाणाला वाचक वर्ग भरभरून दाद देत आहे, हेही एक विशेष म्हणावे लागेल !
आपल्या तांडा संस्कृतीचे जीणे आणि जगणे ते आपल्या वास्तववादी लेखणीतून सहज, ओघवत्या व अस्सल गोरमाटी भाषेचा बाज घेऊन उत्कृष्टपणे मांडत आहेत.
त्यांच्या लिखाणाचे आणखी एक आगळेवेगळे वैशिष्टय म्हणजे ते आवर्जून आपल्या याडीबोलीतून म्हणजे 'गोरमाटी' बोलीभाषेत लिहित असतात. त्यांच्या या लिखाणामुळे वाचकांना अस्सल गोरमाटी मातीचा गंध असलेल्या नवनवीन शब्दांची ओळख होत आहे. गोरमाटी बोलीभाषेतील लुप्त होत असलेले दुर्मिळ शब्द जीवंत ठेवण्याचे महत्कार्य त्यांच्या लेखणीतून घडत आहे. तांडा संस्कृती, चालीरीती, सण - उत्सव, लोकगीते व त्यातील वाड्.मयीन सौंदर्य इत्यादी गोरमाटी संस्कृतीचे विविध पदर ते आपल्या गोरमाटी बोलीभाषेतून अगदी सहज व स्वाभाविकपणे उलगडून दाखवत असतात.
आपल्या जीवनाच्या उत्तरार्धात सुद्धा ते एखाद्या तरुण लेखकाला सुद्धा लाजवेल असे तळमळीने व समाजाच्या अस्मितेपोटी ते अव्याहतपणे लेखन करीत आहेत. आपल्या जीवनाच्या सायंकाळी पार खंगून गेलेल्या शरिरावर अनेक शस्त्रक्रिया झालेल्या असताना सुद्धा, थकलेल्या वयात शरीर, डोळे, कान इत्यादी अवयव व्यवस्थित साथ देत नसताना सुद्धा त्यांच्यातील लेखक, विचारवंत, चिंतनशील वृत्तीचा माणूस त्यांना स्वस्थ बसू देत नाही हे विशेष !
भीमणीपुत्र बापूंचे कोणतेही नवीन पुस्तक प्रकाशित झाले की,ते मला आवर्जून पुण्याला पाठवत असतात. मी त्यांचे सर्व साहित्य आवर्जून नित्यनेमाने वाचत असतो. आपण एका चांगल्या लेखकाच्या, साहित्यिकाच्या, विचारवंतांच्या नेहमी वैचारिक सहवासात आहोत, याचे मला नेहमीच अप्रूप वाटते.
मी आपल्या समस्त गोर बंजारा समाज बांधवांना तसेच सर्व लेखक, कवी , साहित्यिक यांना नम्रपणे सूचवू इच्छितो की, बापूंच्या साहित्य सेवेच्या सन्मानार्थ दरवर्षी त्यांचा जन्मदिवस नित्यनेमाने *' बंजारा भाषा गौरव दिन'* म्हणून साजरा केला जावा. गोरबंजारा साहित्य क्षेत्रात एका उत्कृष्ट लेखकाला त्यांच्या नावाने पुरस्कार सुद्धा सुरू करण्याविषयी सूचवावेसे वाटते.
समारोपाकडे वळताना मी ईश्वराकडे एकच प्रार्थना करेन की, भीमणीपुत्र काकांना चांगले आरोग्य, उदंड आयुष्य लाभो, त्यांचे लेखन यापुढेही सतत वाचण्याचे भाग्य आम्हाला लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! त्यांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मार समस्त गोरमाटी भाषिक गोरभाईं - भेणेवूनं गोरमाटी भाषा गौरव दनेर हार्दिक शुभेच्छा ! 🙏
२ एप्रिल २०२४
◆ डॉ. सुभाष राठोड, पुणे
( लेखक, प्राध्यापक, मा. अभ्यास मंडळ सदस्य, म. रा. पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे )
मो. नं. : 9764200080
Comments
Post a Comment