◆ प्रा.पी.टी.चव्हाण : भटके-विमुक्त व ओबीसींचा बुलंद आवाज !
◆ प्रा. पी. टी.चव्हाण : भटके, विमुक्त व ओबीसींचा बुलंद आवाज !
सामान्यातून असामान्य झालेल्या परंतु सतत सामान्यांची काळजी वाहणारे विमुक्त – भटके,ओबीसी,उपेक्षित, वंचितांचे संघर्षिल व धाडसी नेते, आपल्या अनोख्या कार्यशैलीचा वेगळ्या प्रकारे जनमानसात ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक धडाडीचे तथा उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा.पी.टी.चव्हाण सर.. वाडी वस्ती तांडे,पाडे, पालनिवासी,दुर्लक्षित,वंचित, निराधार, बहुजन व भटक्या – विमुक्तांच्याप्रती अत्यंत संवेदनशील असलेले प्रा.पी.टी. चव्हाण हे महाराष्ट्रातील एक समाजमान्य सर्वश्रुत नेते आहेत. जनमानसातील त्यांची ओळख. तसेच ‘भटके विमुक्त व बहुजन बांधवांचे नेते’ अशीच त्यांची खरी ओळख. कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व व परिश्रमाच़्या बळावर जनमाकेनसात आपल्या कार्याचा ठसा उमटवता येऊ शकतो या विचारावर गाढ श्रद्धा असलेले, त्यासाठी सायास करावे लागतात. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे !’ ही समर्थांनी दासबोधात सांगितलेली उक्ती प्रा. पी. टी. चव्हाण सरांच्या बाबतीत सार्थ ठरते. कोणतीही चळवळ ही निःस्वार्थी हेतूने उभारलेली असावी.ती जनहितासाठी, लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी,अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, लोकांच्या दुःखाचा निरसन करून त्यांना स्वाभिमाने जगता आले पाहिजे, यासाठी असली पाहिजे. चळवळीचा उद्देश विधायक स्वरूपाचा असला पाहिजे हाच प्रा.पी.टी.चव्हाण सर यांनी केंद्रस्थानी मानलेला विचार.. महात्मा फुले - शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आहे. पेशाने ते प्राध्यापक असून देखील आपली नोकरी सांभाळत त्यांच्यातील एक उमदा कार्यकर्ता, समाजसेवक घडत गेला. गेल्या अनेक वर्षांपासून ते भटके – विमुक्त ओबीसींच्या चळवळीत सक्रिय आहेत. समाजाविषयी तळमळीने काम करण्याची जिद्द व राजकारणाची असलेली आवड या गोष्टीचा विचार करुन पूर्ण क्षमतेने समाजकारण व राजकारण करता यावे यासाठी पाच वर्षांपूर्वीच त्यांनी आपल्या ‘प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला.आपण आपल्या समाजाचे काहीतरी खरे देणे लागतो, त्यामुळे समाजभान राखून चालत राहिले पाहिजे.कोणतीच चळवळ लगेच मोठी होत नाही. वेळ दिला की ती हळूहळू मोठी होत जाते.अनंत अडचणी येतात. लोकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण झाली की,चळवळ व्यापक होत जाते. प्रा.पी.टी. चव्हाण नावाच्या अशाच एका ध्येयाने झपाटलेल्या भन्नाट व्यक्तीमत्वाची ही गोष्ट आहे.
▪ कौटुंबिक पार्श्वभूमी : अत्यंत प्रतिकूल,हालाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या प्रा.पी.टी.चव्हाण यांचा जन्म मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ‘रामुनाईक तांडा,केकत पांगरी येथे ७ ऑगस्ट १९६७ रोजी एका गरीब ऊसतोड मजूर कुटुंबात झाला.केकत पांगरी हे जेमतेम पाचशेक लोकवस्तीचे गाव. गेवराई पासून साधारणतः १० किलोमीटरचे अंतर असलेले छोटेसे खेडेगाव. या गावाच्या प्रगतीकडे कोणा राजकारणी लोकप्रतिनिधी वा बुद्धिजीवी लोकांचे लक्ष नव्हते. आई – वडील, सात भाऊ व दोन बहिणी असा त्यांचा मोठा परिवार. ५ पिढ्यांपासून त्यांचे पूर्वज केकत पांगरी तांड्यावरच वास्तव्य करीत आलेले. त्यांचे आजोळ सुद्धा तेच.त्यांचे मामा रामुनाईक हे केकत पांगरी तांड्यांचे नाईक.नाईक म्हणजे बंजारा तांड्याचा प्रमुख.आजही हा तांडा ‘रामुनाईक तांडा’ याच नावाने ओळखला जातो. प्रा.पी.टी.चव्हाण हे आपल्या भावंडांमध्ये ५ व्या क्रमांकाचे. प्रा.पी.टी.चव्हाण सरांचे वडील वारकरी असल्याने साहजिकच ते बालपणापासून एका संस्कारक्षम कुटुंबात वाढलेले. अक्षरशत्रू असलेल्या आई – वडिलांच्या पोटी आशेचा किरण होऊन जन्माला आलेले प्रा.पी.टी.चव्हाण मुळात कर्तव्यकठोर असल्यामुळे त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर अवघ्या बंजारा समाजातील नव्या पिढीला प्रेरणादायी दीपस्तंभ ठरलेले आहेत. बंजारा समाज म्हटला की, पूर्वापार भटकंती करीत आपली गुजराण करणारा एक भटका समाज.अठराविश्व दारिद्र्य त्यांच्या पाचवीलाच पुजलेले. बंजारा समाजाचा तांडा म्हणजे अनेक प्रकारच्या असुविधांचे मूर्तिमंत उदाहरण ! तेथे शैक्षणिक सुविधा तर नव्हत्याच तर इतर सोई - सुविधांचाही पुरता अभाव होता.मात्र अंधश्रद्धेचा पुरता प्रभाव होता. तांड्याच्या एका टोकाला पश्चिमेला त्यांचे एक साधे छोटेसे घर होते. तेथेच त्यांची सर्व भावंडे वाढलेली.शिक्षणाने समृद्ध अशी एखादीच व्यक्ती चुकुन तांड्यावर सापडायची.जणू एखाद्या उंबराच्या दुर्मिळ फुलासारखी ! लहानपणापासूनच शाळा शिकण्याच्या वयातली मुलं आपल्या आई – वडिलांच्या बिऱ्हाडासोबत ऊसतोडणीला जायची. कोवळ्या हातात पुस्तकांऐवजी कोयता घेऊन शाळा शिकण्याच्या वयातली मुलं ऊसतोडणीच्या कामाला जायची.तांड्याच्या आसपासची खेड्यांची अवस्थाही याहून वेगळी नव्हती. दसरा – दिवाळी झाली की आसपासचे वाड्या – वस्त्या, तांडे, पांडे ओस पडायचे. हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुकादमाकडून उचल घेतलेली असायची. एखाद्या ऊसतोड मजुराला जर विचारलं तुम्ही मुलांना सोबत का घेऊन जाता. तर सांगायची, ' पोरांना कुठं ठेवावं म्हणून आणलं सोबत, लयं वाटतं माझ्या मुलानं शिकून मोठं सायेब व्हावं, आम्ही जे भोगतो ते त्यांच्या नशिबात नायी यावं पण काय करणार याला इलाजच नाय ! बरीच मुलं कापूस वेचणीच्या हंगामात मजूर मिळत नसल्याने पालक आपल्या मुलांना कापूस वेचणीसाठी सोबत घेऊन जात असत. त्यातच बीड जिल्हा हा ‘ऊसतोड कामगारांचा एक दुष्काळी जिल्हा' म्हणून सर्वश्रुत आहे. मात्र या परिसरात निसर्गाने मात्र मुक्तहस्ताने उधळण केलेली होती. येण्या-जाण्यासाठी ना पक्का रस्ता.जंगलातली एक गाडीवाट,पावसाळ्यात चिखल तुडवत तांड्यापर्यंतचा प्रवास मोठ्या जिकिरीने करावा लागत असे, पक्के रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, वीज, शाळा, दवाखाना अशा कोणत्याच सुविधा येथे नव्हत्या. गावाच्या आसपास एकही प्राथमिक आरोग्य केंद्र नव्हते. केकत पांगरी गावापर्यंत जायचे म्हटले तर एस. टी. बसची सुविधा नव्हती. प्रवासाचे अन्य साधन उपलब्ध नसल्याने एखाद्या व्यक्तीला गेवराई पर्यंत दवाखान्यात न्यायचे झाल्यास बैलगाडीसारख्या साधनांचा आधार घ्यावा लागत असे. वडिलोपार्जित कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे चव्हाण कुटुंबीय सगळेच मोसमी स्थलांतर करणारे ऊसतोड मजूर होते. धरण बांधकाम, रस्ते इमारत बांधकाम इत्यादी ठिकाणी काबाडकष्ट करून संसाराचा गाडा ओढत न्यावा लागे. हेच चित्र महाराष्ट्रातल्या समस्त बंजारा बांधवांचे. प्रा.पी.टी.चव्हाण सरांचे बालपण आपल्या कुटुंबियांसमवेत तांड्यावरच गेलेले. आई – वडिलांनी राबराब राबून, काबाडकष्ट करीत पै.. पै..जमा करून आपल्या मुलांना शिकण्याचा निर्धार केला. आपल्यासारखं उरफोड मेहनतीचं, कष्टाचं जीणं आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये. आपली परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे वारकरी असलेल्या थावरा नाईकांनी ओळखले होते. पोटासाठी वणवण भटकणाऱ्या आई-वडिलांनी लहानग्या पांडुरंगाला शाळेत पाठविण्याचा निर्धार केला.
▪ शालेय व महाविद्यालयीन शिक्षण : प्रा.पी.टी.चव्हाण सरांचे शिक्षण केकत पांगरी, जालना, गेवराई, बीड इत्यादी ठिकाणी झाले. प्रा.पी टी.चव्हाण यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा आपल्या तांड्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाला. शाळेत नाव घालताना ना दिवस, ना जन्म तारीख माहीत होती. सांकेतिक सण-वारावरुनच गुरूजी त्यावेळी मुलांची जन्मतारीख ठरवायचे. मुलांचा उजवा हात डोक्यावरुन कानाला लागला म्हणजे तो मुलगा पहिलीत जाण्याच्या लायकीचा झाला असे समजले जाई. आपल्या तांड्यातील एका कडूलिंबाच्या झाडाखाली भरत असलेल्या बिन भिंतींच्या शाळेत वडिलांनी लाडक्या पांडुरंगाचे नाव नोंदवले. आणि भावी आयुष्याची बाराखडी गिरवण्यासाठी त्यांची छोटी पावलं पहिल्यांदा त्या शाळेत पहिलीच्या वर्गात पडली.तेथून पुढे प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा झाला.त्यांची शाळा म्हणजे ना भिंत, ना छत, आकाशाचेच छप्पर असलेल्या निसर्ग सन्निध्यात एका लिंबाच्या झाडाखाली भरत असे. आई – वडिलांच्या मोसमी स्थलांतरामुळे पी.टी.सरांना इयत्ता तिसरीनंतर शाळा सोडावी लागली होती. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे त्यांना लहान वयातच शिक्षण थांबवावे लागले. कुटुंबाबरोबर ऊसतोडीचे काम करून त्यानी वडिलांना ऊसतोड कामात मदत करण्यास सुरवात केली.तीन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटल्यानंतर आपल्या मुलाला, पांडुरंगाला शाळेची असलेली आवड पाहून त्यांच्या आई-वडिलांनी परत आपल्या थोरल्या मुलाजवळ जालना येथील सी. टी. एम. के. गुजराती विद्यालयात सहावीच्या वर्गात त्यांना दाखल करण्याचे ठरविले आणि पुन्हा त्यांचे शालेय शिक्षण पूर्ववत सुरू झाले.शालेय वयातल्या पी.टी.सरांनाही नंतर शाळेची चांगलीच गोडी लागत गेली.त्यांचे माध्यमिक शिक्षण जालना येथील सी. टी. एम. के. गुजराती विद्यालय येथेच पूर्ण झाले.ते बालपणापासूनच तल्लख बुद्धी असलेले, चाणाक्ष व हुशार, निर्भीड, स्वच्छंदी, आनंदी वृत्ती, धीट व बोलका स्वभाव, काहीसे बंडखोर वृतीचे व हरहुन्नरी होते. ते आपल्या शाळेचा अभ्यास मन लावून करीत असत.त्यांना बालपणापासूनच अभ्यासाची खूप आवड होती. परीक्षेत त्यांना नेहमीच पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील एक शिस्तप्रिय व हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांना आपल्या गुरुजणांविषयी व वडिलधाऱ्याविषयी फार आदर वाटत असे. बाल सवंगडी जमवण्याची त्यांना बालपणापासूनच आवड होती. आपल्या घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे सुट्टीच्या काळात प्रा.पी.टी.चव्हाण सरांना आपल्या आई-वडिलांसोबत ऊसतोडणीसाठी हातभार लावावा लागत असे. शिक्षण व नोकरीसारख्या क्षेत्रात उच्च वर्गीयांचीच मक्तेदारी असलेला तो काळ होता. बंजारा समाजाच्या तांड्यावर वाढलेली ऊसतोड कामगारांची मुलं आपल्या पालकांना त्यांच्या कामात हातभार लावून शिक्षणात आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होती. तांड्यावर राहून ऊसतोड कामगारांची मुलंही शिक्षण क्षेत्रात आपले नशीब अजमावत होती.सर्वसाधारण कुटुंबातील मुलं सुद्धा आपली गुणवत्ता सिद्ध करून मिळालेल्या संधीचं सोनं करु शकतात याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे प्रा.पी.टी.चव्हाण सर.. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे व आपल्या शिक्षणाच्या खर्चाचा आर्थिक भार आपले आई – वडिल व मोठ्या भावावर पडू नये म्हणून प्रा.पी.टी.चव्हाण सरांना जालन्यातील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करावे लागत असे. तसेच नववी – दहावीत शिकत असताना शाळेचा अभ्यास सांभाळून एका मेडिकल स्टोअर्समध्ये पार्टटाईम काम करावे लागत असे. त्यांचे शालेय जीवन तसे खूप कष्टाचेच होते. आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलायची असेल तर आपण शिकून मोठी व्यक्ती होण्याचा मनोमन निर्धार केला होता. आपल्या प्रयत्नांची शिकस्त करीत प्रा.पी.टी.सरांनी जालना येथे कसेबसे आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
▪ उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण : प्रा.पी.टी.चव्हाण सरांचे ज्युनिअर कॉलेजचे व पदवीपर्यंतचे शिक्षण गेवराई येथील र.भ.अट्टल महाविद्यालयात झाले. ते महाविद्यालयीन विद्यार्थी दशेत शिकत असताना गेवराईतल्या एका उच्चभ्रू वस्तीत आपल्या इतर रूम पार्टनरसह किरायाने रुम घेऊन राहत होते. तेथे त्यांना स्वयंपाक, झाडझूड, कपडे गुणे, भांडी घासण्यापर्यंतची सर्व कामे स्वतःच करावी लागत असत. तेथे त्यांना जीवाभावाचे बरेच मित्र लाभलेले होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत असताना विद्यार्थी त्यांनी बराच मोठा मित्रमेळा जमवला होता.बुद्धी अतिशय तल्लख, विद्यार्थी दशेपासूनच त्यांची बिनधास्त,धाडसी,निर्भीड,निडर, काहीसी बंडखोर वृत्ती,मराठी भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व, अस्खलित शुद्ध मराठी या त्यांच्या अंगभूत गुणांमुळे ते आपल्या मित्रांनाही हवेहवेसे वाटायचे. शालेय स्तरापासूनच त्यांना खेळाची आवड होती. शालेय व कॉलेजच्या विद्यार्थी दशेपासून ते स्नेहसंमेलन,वक्तृत्व स्पर्धा,वादविवाद स्पर्धा,क्रीडा स्पर्धा इत्यादी उपक्रमांमध्ये आवर्जून सहभाग घेत असत. अशा विविध माध्यमांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची संतुलितपणे जडणघडण होऊन नेतृत्वगुण विकसित होत होते.ते आपल्या उत्कृष्ट संवाद कलेमुळे चांगलेच विद्यार्थिप्रिय झाले होते. दैनंदिन कॉलेजचे तास संपले की, गेवराईतील मोटे गल्लीतील डॉ.शिखरे यांच्या दवाखान्याजवळ चौकात जमून त्यांच्या मित्रमंडळीसोबत विविध विषयांवरच्या गप्पागोष्टी व्हायच्या विविध विषयांवरील गप्पांची एक प्रकारची मैफिल रंगायची ! प्रा. पी. टी. सरांचे पदव्युत्तर शिक्षण (एम.ए. - हिंदी) बीड येथील बलभीम महाविद्यालयात झाले.त्यांनी पदव्युत्तर पदवीसाठी हिंदी हा ऐच्छिक विषय घेतला होता. एम. ए. ला विद्यार्थी असताना त्यांनी हिंदी साहित्यातील थोर साहित्यिक व संत कबीर,उपन्यास सम्राट मुंशी प्रेमचंद सारख्या विविध हिंदी साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा तसेच साहित्यशास्त्र व भाषाशास्त्राचे सखोल अध्ययन केले होते. आजही आपल्या भाषणातून ते अनेक ठिकाणी संत कबीरांच्या दोह्यांचा संदर्भ देऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. शिक्षणशास्त्र पदवीचे ( बी. एड्. ) त्यांचे पुढील शिक्षण गेवराई जवळील गढी येथील जय भवानी अध्यापक महाविद्यालयात झाले. तसेच त्यांनी स्वच्छता निरीक्षक हा दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम सुध्दा मुंबई येथे पूर्ण केला आहे. विद्यार्थी दशेत अभ्यासाची भूक काय असते हे प्रा.पी.टी.सरांना कळून चुकले होते. परिस्थितीमुळे खचून न जाता प्रयत्नांची पराकाष्ठा,प्रयत्नातील सातत्य यामुळे मनुष्य एक दिवस नक्कीच यशस्वी होतो हे प्रा.पी.टी.सरांनी सिद्ध करून दाखवले. ध्येयाचा पाठलाग करताना जीवनाच्या खडतर वाटेवरुन चालताना आपले पाय रक्ताळले तरी आपला प्रयत्नरुपी प्रवास अविरत चालू असला पाहिजे. याबाबतीत मोहम्मद रफींचे पुढील एक गीत आठवल्यावाचून राहत नाही ‘ये ज़िंदगी के मेले दुनिया में कम न होंगे अफसोस हम न होंगे।‘ काळ जसजसा पुढे जात होता तसतसे त्याचे व्यक्तिमत्त्वाला आकार मिळत होता. विद्यार्थी दशेत भाकरीला आकार देत आपल्या आयुष्याला ही आकार दिला. बिकट परिस्थितीच्या घनदाट जंगलातून सुद्धा आपल्या जिद्दीच्या जोरावर वाट काढता येते. हे प्रा. पी. टी. सरांच्या विद्यार्थीरुपी जीवनप्रवासाकडे डोकावून पाहिल्यानंतर म्हणावेसे वाटते. कवी विठ्ठल वाघ यांच्या एका गीतातील पुढील ओळी येथे प्रा.पी.टी.सरांच्या बाबतीत सांगाव्याशा वाटतात. ‘ जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी, इथे लाभले पंख लेऊनी उंच भरारी नभात घ्यावी !’ आई-वडिलांच्या हालापेष्टांची करुण कहाणी,अभावग्रस्त जीवन वाट्याला आले असतानाही प्रा.पी.टी.सरांची जिद्दीने शिक्षण शिकण्याची असलेली ओढ,ही बाब आजच्या काळातही कष्ट करुन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. कठीण परिस्थितीतही संयम न सोडणे,स्वभावाचे कडक असूनही हळव्या मनाने नातेसंबंध जपणे, निर्भीड, स्पष्टोक्ता,आपल्या समाजबांधवांसाठी सर्वस्व अर्पण करणारा नेता म्हणून आज त्यांची ओळख बनली आहे.
▪ वैवाहिक जीवनात पदार्पण : आपले उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रा.पी.टी.चव्हाण सरांचा विवाह माजलगाव येथील लघुपाटबंधारे खात्यात ‘प्रयोगशाळा सहाय्यक' पदावर सरकारी सेवेत असलेल्या हरिश्चंद्रराव यांची ज्येष्ठ कन्या रंजना यांच्याशी वयाच्या २७ व्या वर्षी दि.१९ मे १९९५ रोजी बंजारा समाजाच्या पारंपरिक रीतिरिवाजानुसार केसापुरी कॅम्प ( माजलगाव) येथे संपन्न झाला. हरिश्चंद्रराव यांना दोन मुले बाळासाहेब व दत्ता हे होत, तर रंजना व संतोषी या दोन मुली आहेत. रंजना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.रंजना ह्या स्वयंस्फूर्तीने प्रा.पी.टी.चव्हाण सरांच्या सामाजिक कार्यात आवर्जून सहभागी असतात.जीवनातल्या चढ-उताराच्या समयी सौ. रंजनाताई चव्हाण ह्या प्रा.पी.टी. सरांच्या पाठीशी सदैव सावलीप्रपमाणे भक्कमपणे उभ्या असतात. त्यांच्या संसारवेलीवर सायली आणि मयुरी अशी कन्यारत्नरुपी दोन फुले उमलली आहेत. मोठी कन्या सौ. सायली ही बी. टेक, एम. बी. ए. असून तिचा विवाह २७ नोव्हेंबर २०२० मध्ये आय. टी. सी. कंपनीत नाशिक येथे इंजिनिअर असलेल्या अजय राठोड यांच्याशी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. धाकटी कन्या मयुरी हिचे एका आजारामुळे १७ मार्च २०२१ रोजी दुःखद निधन झाले. स्व. मयुरी ही १२ वी सायन्सची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन औरंगाबाद येथे वैद्यकीय, अभियांत्रिकी व स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आपले पुढील करीअर घडविण्यासाठी नीट, जेईई परीक्षेची तयारी करीत होती. दुर्दैवाने दोन वर्षांपूर्वी तिला एका आजाराने घेरले होते. औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुनही तिचे दुःखद निधन झाले. प्रा.पी.टी.चव्हाण यांना मुलगा नसल्याने ते आपल्या मुलींनाच मुलांसमान मानत असत. कोणत्याही आई-वडिलांना आपली लेक अत्यंत प्रिय असते. स्व. मयुरीचे अकाली जाणे हे चव्हाण कुटुंबीयांसाठी अत्यंत वेदनादायी होते.ते अजूनही या दुःखातून पुरते सावरलेले नाहीत. स्व.मयुरीला शिक्षणाबरोबरच राजकारणाचीही आवड होती. कदाचित ती जर हयात असती तर राजकीय,सामाजिक कार्यकर्तीच्या रुपाने भविष्यात यशस्वी वाटचाल केली असती. आता थोरली कन्या सौ. सायली हीच त्यांचे सर्वस्व असून जीवन जगण्याचा मुख्य आधार, आशेचा किरण तिच आहे.
▪ व्यावसायिक कारकीर्द : प्रा.पी.टी.सरांनी आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या प्रयत्नाने जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ,गेवराई या संस्थेत ज्युनिअर कॉलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवली. सुरुवातीला त्यांना बरीच वर्षे विनावेतन अध्यापनाचे काम करावे लागले. त्यापुढील काळात त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाच्या बळावर. 'प्रा. पी. टी. चव्हाण' म्हणून आपली खास ओळख निर्माण केली. बरीच वर्षे सेवा केल्यानंतर नोकरीत त्यांचे मन फारसे रमले नाही. शेवटी आपल्या नोकरीला बाय - बाय म्हणत त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून स्वतःला समाजसेवेत झोकून दिले.
▪ प्रा. पी. टी. चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व विशेष :
▪ अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड ▪ सामाजिक,सांस्कृतिक कार्यातील योगदान ▪ सेवेत असताना पहिले राजकीय पाऊल ▪ भटक्या – विमुक्त व बहुजन बांधवांचा बुलंद आवाज ▪ एक उत्कृष्ट नेते आणि प्रभावी वक्ते ▪ आदर्श लोकप्रतिनिधी ▪ राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी ▪ कार्यकर्त्यांना जपणारे नेते ▪ सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण ▪ ‘तांड्याकडे चला’ हा नारा ▪ विविध आंदोलने, मोर्चे, उपोषण ▪ फुले – शाहू – आंबेडकर विचारधारेचे पाईक
▪️ भारतीय जनता पार्टी (भाजपा) मध्ये प्रवेश :
राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती ही महाराष्ट्र राजकारणातली एक महत्त्वपूर्ण घटना आहे. या घटनेचे दूरगामी परिणाम राज्याच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे.
▪ ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सिंहांचा वाटा :
मागील तीन - चार वर्षांपासून सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात प्रा. पी. टी. चव्हाण यांनी बीड जिल्हा सह राज्यभरातील मोर्चा व जेलभरो व रास्तारोको आंदोलनात सिंहांचा वाटा उचलला आहे.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न त्यांनी खूप जवळून अनुभवाला आहे. त्यांनी या प्रश्नावर गंभीर विचार करून 'ओबीसी आरक्षण बचावो' अभियानाला पाठिंबा दिला व ते स्वतः या अभियानाचा एक भाग बनले.
ओबीसी समाजाला त्यांचे संवैधानिक हक्क मिळवून देणे आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे यासाठी अविरत प्रयत्न करीत आहेत. त्यात जनजागृती मोहिमे, आंदोलने, मोर्चे, जेलभरो आंदोलन, उपोषण इत्यादींचा समावेश आहे. या अभियानामुळे ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कांबद्दल जागरुकता आली आणि त्यांनी एकजुटीने लढा दिला. यामुळे ओबीसी आरक्षण बचाव अभियानाला बळ मिळाले आहे.
ओबीसींचे आधारस्तंभ ना. छगनराव भुजबळ, मंत्री ना. धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई साहेब मुंडे,आ गोपीचंद पडळकर, आ.महादेव जानकर यांच्या उपस्थितीत एक वर्षापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या ओबीसी,भटके विमुक्तांच्या आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यात व ओबीसींचे संघर्ष योद्धे प्रा.लक्ष्मण हाके सर व नवनाथ आबा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या वडीगोद्री येथील ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात तसेच ओबीसींच्या अभिवादन व जनआक्रोश यात्रेत प्रा.पी.टी.चव्हाण यांनी तनमनधनाने सहभाग नोंदविला आहे. ओबीसी,भटके विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी मागील ३० वर्षांपासून रस्त्यावर उतरून व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटून बंड करणारा नेता म्हणून प्रा.पी.टी.चव्हाण हे राज्यभर ओळखले जातात..
◆ शब्दांकन : डॉ. सुभाष राठोड, पुणे
Comments
Post a Comment