समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारी गोर बंजारा होळी - डॉ. सुभाष राठोड
◆ समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारी गोर बंजारा होळी प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे पुरातन काळापासून रान-माळात, डोंगर – दऱ्याखोऱ्यांत, गिरी-कंदरात वस्ती करून राहणारा, मेहनती, काटक या गुण वैशिष्ट्यांनी आपले जीवन आबादी आबाद करणारा गोर बंजारा समाज यांची ‘गोर संस्कृती’ ही जगावेगळी आहे. त्यांचे जीवनच मुळात नित्य – नैमित्तिक सण – उत्सवांनी पुरेपूर भरलेले आहे. नृत्य – संगीत हा त्यांचा स्वभाव धर्म आहे. कोणाचे मनोरंजन किंवा करमणूक करण्यासाठी त्यांचे हे सांस्कृतिक आविष्कार आविष्कृत होत नसून त्यांच्या जीवन जगण्याचाच तो एक स्थायीभाव, अविभाज्य भाग आहे. आपल्या समाजात जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक घटनेला संस्कार, विधी आहेत आणि प्रत्येक सण – समारंभ, विधी, संस्कारांच्या वेळी नृत्य, गीत – संगीत आहेच ! गोर बंजारा समाजाच्या होळीच्या उत्सवात, बंजारा समाजाच्या प्रथा, रूढी आणि, परंपरांचे सांस्कृतिक दर्शन घडते. गोर – बंजारा समाजाचा होलिकोत्सव हा एक जणू आनंदोत्सवच ! मानवी नात्याची वीण घट्ट करणारा, प्रेम आणि आनंदाची मुक्तहस्ते उधळण करणारा सण म्हणजे होळी स...