महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक, समतेचे अग्रणी, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, अस्पृश्यांचे उद्धारक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे उत्तराधिकारी, दूरदृष्टीवान शासक, थोर समाजसुधारक, युगपुरुष शिक्षणप्रेमी आणि दलित-शोषितांचे कैवारी, स्त्री-पुरुष समानतेचे समर्थक, समाज परिवर्तनाचे अग्रदूत, क्रांतिकारी राजे, त्यांच्या कार्याचा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव पडला आहे असे थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांची २६ जुलै रोजी जयंती साजरी केली जाते. जयंतीनिमित्त त्यांचे महान विचार व कार्यास विनम्र अभिवादन ! महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे आपल्या राज्यास ‘फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र’ असे संबोधले जाते.
राजर्षी शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारणावादी मानले जातात. २६ जून हा राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो, या दिवशी आपण महाराजांच्या महान कार्याची कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या समर्पक कार्याने आणि दूरदृष्टीने त्यांनी राज्यात आणि समाजात अनेक क्रांतिकारी बदल घडवून आणले. आजही ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेखनप्रपंच..
छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल, कोल्हापूर येथे घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव घाटगे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व ‘शाहू’ हे नाव ठेवले. लहानपणी घरीच त्यांचे अनौपचारिक शिक्षण झाले. सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी शाहू महाराज विवाहबद्ध झाले. त्यांच्या बालपणातील अनुभवांमुळे त्यांना गरीब आणि वंचितांच्या समस्या समजून घेण्यास मदत झाली. त्यांच्या शिक्षणामुळे त्यांना आधुनिक विचारांशी परिचित होण्यास मदत झाली आणि त्यांना समाजसुधारणेसाठी प्रेरित केले. आपल्या शैक्षणिक जीवनात त्यांनी इंग्रजी, मराठी, संस्कृत, इतिहास आणि राजकारण या विषयांचा सखोल अभ्यास केला. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म एका जहागीरदार घराण्यात जरी झाला असला तरी त्यांनी लहानपणापासूनच सामाजिक न्याय आणि समानतेसाठी लढा दिला.को
कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी यांच्या निधनानंतर शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर विराजमान झाले. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. राज्यभर फिरून लोकांची परिस्थिती, गरजा व त्यांची दुःखे जाणून घेतली. सामान्य जनतेच्या भावना ओळखून त्यांचे दुःख निवारणासाठी काम त्यांनी आयुष्यभर केले. अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता या तीन व्याधी मुळापासून उपटून काढल्याखेरीज आपल्या प्रजेच्या विकासाच्या वाटा खुल्या होणार नाहीत, याची खूणगाठ बांधून महाराजांनी कामाला सुरुवात केली. गावोगावी शाळा काढल्या, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले, पुरोहित शाळा सुरू केल्या. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्याचे कार्य होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली.
शाहू महाराज अस्पृश्यता निर्मूलनासाठी आपल्या कुटुंबापासून प्रयत्न करत होते. एकदा शाहू महाराज शिरोळला शिकारीला गेले होते. तेव्हा महाराजांनी चहासाठी म्हणून शिरोळच्या तुकाराम कांबळे यांना चहाचे दुकान घालून दिले. ते नेहमी गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलमध्ये स्वतः जात, चहा आणि फराळ घेत आणि त्यामुळेच अस्पृश्यतेचे वलय हळूहळू सौम्य व्हायला लागले होते. कोल्हापूर येथील भवानी मातेचे मंदिर त्यांनी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजासाठी खुले केले. आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून त्यांनी यशस्वीपणे प्रयत्न केले. महाराजांचे वर्तन ‘बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले।‘ या उक्तीला साजेसेच होते. त्यांनी इंदूरच्या धनगर जमातीतील राजघराण्याशी आपल्या घराण्याचे सोयरेसंबंध घडवून आणले. जातिभेद मोडण्यासाठीचा हा कृतिशील प्रयत्न होता.
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम महाराजांनी राबवले. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. त्याचबरोबर जर एखाद्या स्त्रीला तिच्या घरातून वाईट वागणूक देत असतील तर अशा अपराधींना सहा महिने कारावास व दोनशे रुपये दंड करण्याची तरतूद देखील कायद्यात होती. घटस्फोट आणि वारसा कायदा सुद्धा त्यांनी पास केला होता. त्याचबरोबर स्त्रियांच्या शिक्षणाबाबत एक पाऊल पुढे जात त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने, हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली.
बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली स्वतःची ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले. एकूण 23 वसतिगृहे अनेक जाती – जमातींसाठी, धर्मासाठी बांधली होती. त्यामुळे प्रत्येक जातीच्या लोकांना स्वतःचा विकास करण्याची संधी उपलब्ध झाली. ही वसतिगृहे सर्व जातीं – धर्मासाठी खुली ठेवली. त्यामुळेच मराठा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांसह सर्व जातींमधील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची समान संधी मिळाली.
मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के राखीव जागांची (आरक्षणाची) तरतूद करुन त्याची त्वरित अंमलबजावणी देखील महाराजांनी केली.
आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली. पुढील काळात या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली. यासाठी कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारले. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. डॉ. बाबासाहेब यांनी काढलेले ‘मूकनायक’ हे पाक्षिक आर्थिक अडचणीमुळे बंद पडले होते. महाराजांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली. शाहूराजे हे ‘सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते’ असे गौरवोद्गार बाबासाहेब आंबेडकर यांनी काढले होते.
शाहूंनी आपल्या कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले. तरुणांना पदवीपर्यंत पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी राजाराम कॉलेजची स्थापना केली. वेठबिगारी ही पद्धत बंद केली. बारा बलुतेदार यांना कोणताही आवडीचा व्यवसाय करता यावा याची मुभा दिली आणि कामांचा मोबदला पैशाच्या स्वरूपात घेऊ शकतात असे आवाहन केले होते. महार वतन पद्धत इ.स.१९१८ साली कायद्याने बंद केली. स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणाऱ्या पतसंस्था यांची स्थापना केली. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेती संशोधनावर भर दिला. नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. दुष्काळाचा सामना करता यावा यासाठी ‘राधानगरी’ नावाचे धरण बांधले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता ‘असा राजा होणे नाही !’
अस्पृश्यता निर्मूलन आणि मागासवर्गीय कल्याणासाठी प्रयत्न, मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, स्त्रियांसाठी शिक्षण आणि समान हक्कांसाठी लढा. शेती आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणा, कला, संस्कृती आणि साहित्य क्षेत्रातील योगदान, समानता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाजाची कल्पना, मागासवर्गीय आणि अस्पृश्य समाजाला समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न, आरक्षणाची तरतूद, यांसारख्या लोककल्याणकारी योजनांमुळे महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीला चालना मिळाली. एकंदरीत राजर्षी शाहू महाराज हे एक महान विचारवंत आणि समाजसुधारक राजे होते. ज्यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रतिबिंब आपणास आपल्या भारतीय संविधानात सुद्धा पाहावयास मिळते. शाहू महाराज हे लोकशाही मूल्यांचे कट्टर समर्थक होते. त्यांनी आपल्या राज्यात अनेक लोकशाही सुधारणा राबवल्या आणि नागरिकांना अधिक अधिकार दिले. आजही आपल्या देशाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे आणि शाहू महाराजांच्या लोकशाही मूल्यांचा अवलंब करून आपण त्यांना पार करू शकतो. शिक्षण हेच समाजातील प्रगतीचे मुख्य साधन आहे आणि शाहू महाराजांच्या विचारांचा आदर करून आपण सर्वांसाठी शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू शकतो. आजच्या ज्ञान-आधारित अर्थव्यवस्थेत शिक्षणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे प्रेरित होऊन आपण शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि सर्वांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यांनी शेतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि कामगारांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. आजही देशातील शेतकरी आणि कामगार अनेक समस्यांना तोंड देत आहेत. आपण शाहू महाराजांच्या विचारांचा अवलंब करून त्यांच्यासाठी अधिक चांगल्या भविष्याची निर्मिती करू शकतो. आजही समाजात जातीभेद आणि भेदभाव अस्तित्वात आहे, शिक्षण आणि संस्कृती या क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत. शाहू महाराजांच्या विचारांचा अवलंब करून आपण त्यांना दूर करू शकतो. आजही समाजातील अनेक घटक सशक्तीकरण आणि स्वावलंबनासाठी संघर्ष करत आहेत. शाहू महाराजांच्या विचारांचा अवलंब करून आपण त्यांना मदत करू शकतो. त्यांचे विचार आजही समाजासाठी अनेक दृष्टींनी महत्त्वाचे आहे. शाहू महाराजांच्या नावाने व्यक्ती आणि संस्थांना सरकारकडून सध्या विविध पुरस्कार दिले जातात. “शाहू राजा नुसता मराठा नव्हता, ब्राह्मणेतर ही नव्हता. तो नवयुगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होता असे गौरवोद्गार महर्षी वि. रा. शिंदे यांनी काढलेले आहेत. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे सकाळी ६ वाजता महाराज स्वर्गवासी झाले झाले. त्यांच्या निधनामुळे कोल्हापूर संस्थानातील जनता शोकाकुल झाली होती. शिक्षण, सामाजिक न्याय आणि समता यांच्या त्रिवेणी संगमावर आधारित छत्रपती शाहू महाराजांचे कार्य महाराष्ट्रासाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा !
- प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे
- मा. अभ्यास मंडळ सदस्य, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पुणे
Comments
Post a Comment