गुरुपौर्णिमा : ज्ञानाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव ! - डॉ. सुभाष राठोड, पुणे
21 जुलै 2024 – गुरुपौर्णिमा विशेष
गुरुपौर्णिमा : ज्ञानाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव
◆ प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे
“गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात् परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नमः।।“
आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी ‘गुरुपौर्णिमा’ हा उत्सव साजरा केला जातो. जो ‘व्यास पौर्णिमा’ म्हणूनही ओळखला जातो. गुरु पौर्णिमा ऋषी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त साजरी केली जाते, या दिवशी, महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते. ते हिंदू धर्मातील सर्वात महान गुरुंपैकी आद्यगुरू मानले जातात. त्यांनी महाभारत, वेदांची सूत्रबद्ध विभागणी, ब्रम्हसूत्रे, आणि अनेक पुराणे लिहिली असे मानले जाते. गुरुचे आपल्या जीवनात महत्त्व आजही अतुलनीय आहे. हा दिवस ज्ञान, शिक्षण आणि गुरू यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला देवतुल्य मानले आहे. ‘मातृदेवो भव’, ‘पितृदेवो भव’, ‘आचार्य देवो भव’ चा संस्कार आपल्या मनावर आहेच. आपले आई-वडील हे आपले आद्यगुरु. बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकतो. शालेय जीवनापासून आपले शिक्षक आपल्याला ज्ञानसंपन्न करण्याचा प्रयत्न करत असतात. अज्ञानरूपी अंधकारात ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे. ‘गुरु बिन कौन बताये बाट, बड़ा विकट यमघाट’ अशा परिस्थितीत योग्य रस्ता दाखवण्याचे काम आपले गुरुजन करीत असतात. गुरु म्हणजे जो लघु नाही, गुरु म्हणजे मोठा, विशाल ! गुरु म्हणजेच शिक्षक किंवा मार्गदर्शक जो आपल्याला ज्ञान, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन प्रदान करतो. गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश फुलवतो, अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि ध्येय गाठण्यासाठी, योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतो. एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. गुरुपौर्णिमा या सणाची पार्श्वभूमी, महती आणि विविधता याबद्दल अधिक जाणून घेऊया.
भारतीय संस्कृतीमध्ये गुरु-शिष्य परंपरा अत्यंत प्राचीन आणि आदरणीय आहे. हजारो वर्षांपासून, ज्ञान आणि कौशल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुरु आणि शिष्यांच्या माध्यमातून हस्तांतरित होत आलेली आहेत. प्राचीन भारतातील गुरु-शिष्य परंपरा अत्यंत महत्त्वाची आणि समृद्ध होती. ही परंपरा भारतीय शिक्षण व्यवस्थेचा आधारस्तंभ मानली जाते. गुरु-शिष्य परंपरेचा उगम वेदकाळात (इ.स.पू. 1500 ते 500) असल्याचे मानले जाते. वेद ही प्राचीन संस्कृत ग्रंथांची जननी मानली जाते, जी ज्ञानाचा आणि शिक्षणाचा मुख्य स्रोत होती. ऋषी हे त्या काळी गुरुंची भूमिका पार पाडत होते आणि ते आपल्या शिष्यांना वेद आणि इतर विषयांचे शिक्षण देत असत. पूर्वीच्या काळी आपला भारत हा एक प्रमुख शैक्षणिक महासत्ता होता. प्राचीन काळात भारतात तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला आणि वल्लभी अशा नामांकित विद्यापीठांची स्थापना झाली होती. या विद्यापीठांमुळे भारताचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व वाढले होते, ज्यामुळे भारत हा शैक्षणिक महासत्ता म्हणून ओळखला जात असे.
प्राचीन भारतात, गुरुकुल ही शिक्षणाची प्रमुख पारंपरिक पद्धत होती. गुरुकुल हे गुरूंचे निवासस्थान होते जिथे ते शिष्यांना शिक्षण देत असत. उपनयन संस्कार संपन्न झाल्यानंतर शिष्याला शिक्षणासाठी गुरुच्या आश्रमात पाठवले जाई. शिष्य अनेक वर्षे गुरुकुलात राहून वेद, धर्म, तत्त्वज्ञान, कला, संगीत, योगशास्त्र, संख्याशास्त्र आणि इतर विषयांचा अभ्यास करत असत. गुरुच्या आश्रमात शिष्यांला आपल्या दैनंदिन ज्ञानार्जनाबरोबरच आश्रमातील हलकी फुलकी कामे करावी लागत, त्यामुळे स्वाभाविकच स्वावलंबनासारखे गुण शिष्याच्या अंगी बिंबवले जाई. मध्ययुगीन काळात (इ.स. 500 ते 1800), अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक गटांनी गुरु-शिष्य परंपरा स्वीकारली. भक्ति संप्रदायांमध्ये, गुरुंनी भक्ती आणि ईश्वराशी व्यक्तिगत नातेसंबंधावर भर दिला. आधुनिक काळात (इ.स. 1800 ते सध्या), गुरु-शिष्य परंपरा अजूनही टिकून आहे. अनेक क्षेत्रात, जसे की संगीत, नृत्य, कला, अभिनय, मार्शल आर्ट, ज्ञान आणि कौशल्ये अजूनही गुरु-शिष्य परंपरेद्वारे हस्तांतरित केले जातात. गुरु-शिष्य परंपरा ज्ञान आणि कौशल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.
गुरुकुल शिक्षण प्रणाली ही त्याकाळातील मुख्य शिक्षण प्रणाली होती, ज्यात विद्यार्थी त्यांच्या गुरुच्या आश्रमात, गुरुगृही शिक्षण घेण्यासाठी राहात असत. गुरुकुल शिक्षणपद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना केवळ शास्त्र किंवा विद्या शिकवली जात नव्हती, तर त्यांना नैतिक मूल्ये, धार्मिक शिक्षण, आणि जीवन कौशल्येही शिकवली जात होती. शिष्यावर आपल्या प्रभावशाली गुरुचा आपसूकच खूप मोठा प्रभाव पडत असे. गुरु-शिष्य परंपरेत विद्यार्थ्यांचा आपल्या गुरुंप्रती निता आदर असे आणि गुरु त्यांच्या शिष्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असत. गुरु त्यांच्या शिष्यांना ज्ञान, अनुभव आणि आचारधर्म शिकवून त्यांना समाजात उत्तम नागरिक बनवण्याचे काम करत असत. या परंपरेत गुरु-शिष्यांचे नाते अत्यंत निकट आणि विश्वासपूर्ण असे. विद्या ग्रहण करण्यासाठी शिष्य गुरुंकडे विनम्रतेने जाऊन दीक्षा घेत असे. शिष्याने गुरुच्या आदेशानुसार वागणे आणि त्यांना संपूर्ण श्रद्धा व भक्तीने सेवा करणे अपेक्षित असे. या परंपरेने भारतीय समाजाला अनेक महान विचारवंत, तत्त्वज्ञ आणि धार्मिक नेते दिले आहेत. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी गुरु-शिष्य परंपरेचे उल्लेख आढळतात. महाभारत, रामायण, उपनिषद, आणि पुराणे यांसारख्या ग्रंथांमध्ये गुरु-शिष्यांच्या कथा आणि त्यांच्या नात्याचे महत्त्व विषद केले आहे. अर्थात पूर्वीच्या काळात भारतात सामाजिक, धार्मिक, आणि आर्थिक कारणांमुळे बहुजनांना (विशेषतः शूद्र आणि अस्पृश्यांना) शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला होता. वर्णव्यवस्थेनुसार भारतीय समाज चार मुख्य वर्णांमध्ये विभागलेला होता - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि शूद्र. धार्मिक ग्रंथांमध्ये शिक्षणाचे अधिकार मुख्यतः उच्चवर्णीयांनाच दिले गेले होते. मनुस्मृतीसारख्या ग्रंथांमध्ये असे म्हटलेले आहे की शूद्रांना वेदांचे अध्ययन करणे निषिद्ध आहे. उच्च वर्णीय समाजाने त्यांच्या सामाजिक, आर्थिक, आणि धार्मिक प्रभुत्व टिकवून ठेवण्यासाठी बहुजन समाजाला शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांच्या शिक्षण धोरणांमुळे शिक्षणातील सुधारणा होऊ लागल्या. तथापि, या सुधारणा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, राजा राममोहन रॉय, म. गांधी, डॉ . बाबासाहेब आंबेडकर, वि. रा. शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांसारख्या अन्य समाजसुधारकांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. 20 व्या शतकात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निवारण आणि शिक्षण हक्कांसाठी खूप प्रयत्न केले. पुढे 1950 साली भारतीय संविधान अमलात आल्यानंतर सर्व नागरिकांना समान हक्क दिले गेले. अनुच्छेद 14, 15, 17 आणि 21A ने सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला. अनुच्छेद 17 ने अस्पृश्यतेला संपवून सर्वांना समानतेचा अधिकार दिला. शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 या अधिनियमानुसार, 6 ते 14 वयोगटातील सर्व मुला – मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे हे राज्याचे कर्तव्य ठरविण्यात आले.
आजच्या आधुनिक काळातही गुरु-शिष्य परंपरेचा आदर केला जातो, परंतु तिच्या स्वरूपात बदल झाले आहेत. आता विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालये, आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण दिले जाते, पण गुरु-शिष्यांचे नाते अजूनही तितकेच महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी, शिष्य आपल्या गुरूंना ज्ञानाचा प्रकाश दाखविल्याबद्दल आणि त्यांच्या जीवनात मार्गदर्शन करण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. गुरू आपल्या शिष्यांना आध्यात्मिक आणि नैतिक मार्गदर्शन देतात आणि त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली शिकवण देतात. चांगला गुरु आपल्या शिष्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर त्यांना संस्कार, मूल्ये आणि नीतिमत्तचे धडे देतात, जे जीवनातील यशस्वीतेसाठी आवश्यक असते. गुरुपौर्णिमा हा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील बंध मजबूत करण्याचा दिवस. गुरु आपल्या जीवनात जणू सूर्यप्रकाशासारखे येतात आणि आपणास ज्ञानाचा प्रकाश दाखवतात, सद्गुणांचा मार्ग दाखवतात, चांगुलपणाची शिकवण देतात आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी शक्ती देतात. चांगले गुरु केवळ शिकवणुकीपुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते आपल्या शिष्यांना जीवनातील प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक आणि प्रेरणादायी शक्ती बनतात. ते आपल्याला चुकीच्या मार्गापासून दूर ठेवतात आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. गुरु आणि शिष्यांच्यातील नाते हे केवळ शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यापेक्षा अधिक आहे. प्रेम, आदर आणि कृतज्ञतेने बांधलेले हे गुरु-शिष्यांचे अटूट बंधन आहे. गुरु आपल्या शिष्यांना आपल्या मुलांपेक्षा कमी मानत नाहीत आणि शिष्य आपल्या गुरुंना आपल्या पालकांपेक्षा जास्त आदर देतात.
गुरुपौर्णिमेचा दिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी, मंदिरे आणि आश्रम, शाळा, महाविद्यालयात गुरुंना वंदन केले जाते. भक्तगण गंगेत स्नान करतात आणि दान करतात. अनेक ठिकाणी, गुरु-शिष्यांच्या परंपरांमध्ये भाग घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये गुरु आणि शिष्यांचे भाषण, गायन आणि नृत्य – संगीत इत्यादींचा समावेश असतो.
गुरुपौर्णिमेचा संदेश ज्ञानाचा आणि शिक्षणाचा आहे. गुरु पौर्णिमा आपल्याला शिक्षणाचे महत्त्व आणि गुरूंच्या योगदानाची आठवण करून देते. या दिवशी, आपण आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्यांच्या शिकवणींचे पालन करण्याचा प्रयत्न करावा. गुरुपौर्णिमेचे स्वरूप आजच्या काळात खूप बदललेले दिसून येते. पूर्वीच्या काळी गुरुपौर्णिमा हा एक धार्मिक आणि आध्यात्मिक सण म्हणून साजरा केला जात असे. गुरुंचे महत्त्व, त्यांचे आशीर्वाद आणि शिक्षणाचे महत्व या दिवशी विशेषरित्या अधोरेखित केले जाई.
आधुनिक काळात आधुनिक शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा प्रभावामुळे, गुरुपौर्णिमेचा अर्थ आणि साजरा करण्याची पद्धत थोडी बदलली आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या आगमनामुळे, गुरुपौर्णिमेचा उत्सव अधिक व्यापक झाला आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि अनुयायी आपापल्या गुरुंना ऑनलाइन शुभेच्छा देतात, व्हिडिओ कॉल्सद्वारे गुरुंचे आशीर्वाद घेतात, आणि सोशल मीडियावर पोस्ट्स शेअर करून गुरुंचे महत्त्व अधोरेखित करतात.
त्याचबरोबर, शाळा, महाविद्यालये, आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कवितावाचन, भाषणे आणि चर्चासत्रे असतात. त्यामुळे, गुरुपौर्णिमा हा उत्सव साजरा करण्याचा पारंपरिक ढंग बदलून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जगभरातील माहिती आणि संसाधनांमध्ये प्रवेश मिळतो. यामुळे गुरू आणि शिष्य यांच्यातील पारंपारिक संबंध बदलले आहेत. जग अधिकाधिक एकमेकांशी जोडले जात आहे, ज्यामुळे विविध संस्कृती आणि विचारसरणींशी संपर्क वाढत आहे. लोकांना आता त्यांच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार गुरू निवडण्याची अधिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे या सणाचा आवाका वाढला असून त्याचे महत्त्व अधिक लोकांपर्यंत पोहोचले आहे. गुरुपौर्णिमा काळानुसार बदलत आहे, परंतु ज्ञान आणि मार्गदर्शनाची गरज कायम राहते. आजच्या जगात, गुरू अनेक रूपांमध्ये येतात आणि ते विविध प्रकारे शिकवण देतात. महत्त्वाचे म्हणजे आपल्याला योग्य मार्गदर्शक मिळवायचा आहे आणि त्यांच्याकडून शिकण्यास आणि वाढण्यास, विकसित होण्यासाठी तत्पर रहायचे आहे. माऊली ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे, ‘सद्गुरु सारीखा असता पाठीराखा। इतरांचा लेखा कोण करी’
संसारसागरातून तरून जाण्याचा मार्ग सद्गुरू दाखवतात तर आपले शिक्षक आपणास ज्ञानसागर तरून जाण्याचा, योग्य ज्ञानाचा मार्ग दाखवतात हेच खरे !
“गुरु पाठीराखा,
गुरुच असतो सखा,
गुरु म्हणजे सावली,
गुरु म्हणजे आपला उद्धारकर्ता ,
गुरु म्हणजे सुखाचा सागरू,
गुरु म्हणजे कल्पतरू”
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सर्व गुरुजनांना वंदन !
Comments
Post a Comment