◆ नवमहाराष्ट्राचे शिल्पकार : वसंतराव नाईक

          प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे 

  आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या थोर शिल्पकारांची नावे इतिहासाच्या सुवर्ण पटलावर कोरली गेलेली आहेत, त्यात स्वतंत्र महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. १ जुलै ही त्यांची जयंती ‘कृषिदिन’ म्हणून साजरी केली जाते.स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र घडविणारे महत्वाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या नावाचा अग्रक्रमाने उल्लेख केला जातो. आज महाराष्ट्राची जो काही जडणघडण झाली आहे, त्यामध्ये सदरील मुख्यमंत्र्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. नाईक हे महाराष्ट्रातील हरितक्रांती, पंचायतराज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजना यांसारख्या लोककल्याणकारी योजनांचे प्रवर्तक मानले जातात. या महनीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याला खऱ्या अर्थाने सुजलाम, सुफलाम केले आहे. माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी “वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत.” या शब्दात नाईकांचा गौरव केला. वसंतराव नाईक यांनी कृषीऔदयोगीक क्षेत्रात अमुलाग्र अशी कामगिरी केली. ते हाडाचे प्रगतशील शेतकरी होते. याशिवाय शेती आणि मातीवर त्यांची निस्सीम भक्ती होती. आपले संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेचले. शेतकरी हिताचे अनेक क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून १ जुलै ही त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतला.

   यशवंतराव चव्हाणांच्या नंतर आजच्या प्रगतीशील महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेऊन पोचवले ते वसंतराव नाईक यांनी. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याकडून चालत आलेला नेतृत्वाचा वारसा वसंतराव नाईक यांनी अतिशय समृद्ध आणि संपन्न केला. महाराष्ट्र राज्याला ज्यांचे प्रदीर्घ नेतृत्व लाभले असे उत्कृष्ट प्रशासक, लोकप्रिय नेते, वंचितांचे उद्धारकर्ते, शेतकऱ्यांचे कैवारी तसेच महाराष्ट्र कृषी कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते. मानवतावाद, न्याय व समतेसाठी सत्तेचा वापर करणारे सर्वाधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे, महाराष्ट्राच्या कृषी – औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, कित्येक कल्याणकारी योजनांचे जनक म्हणून वसंतराव नाईक यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्रात केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये वसंतराव नाईक यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ म्हणजे सलग ११ वर्षाहून अधिक काळ ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी राहिले. आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात एकाही मुख्यमंत्र्यांला एवढा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

   आजपर्यंत मागील ६३ वर्षांमध्ये २० मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मुख्यमंत्री अर्थातच कॉग्रेस पक्षाचे आहेत. जवळपास ५० वर्षे मुख्यमंत्री पद कॉग्रेस पक्षाकडे राहिले. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे वसंतराव नाईक राहिलेले आहेत. त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस वगळता कुठल्याच मुख्यमंत्र्यांना आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. वसंतराव नाईक यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या इतिहासातील हा केवळ विक्रमच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे सुवर्णयुग म्हणावे लागेल. वसंतराव नाईक यांची कारकीर्द सुस्थिर सरकार व गतिमान विकास यासाठी उल्लेखनीय ठरलेली आहे. त्यांना महाराष्ट्राच्या ‘कृषी-औद्योगिक क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. ग्रामीण भागात जन्मलेले, स्वकर्तृत्वाने राजकारण, समाजकारण यामध्ये त्यांनी छाप सोडली. त्यांची तल्लख बुद्धिमत्ता, संघटन कौशल्य, दूरदृष्टी, अखंड परिश्रम, सर्वसामान्य, उपेक्षित व शेतकऱ्यांबद्दल त्यांची कळवळ हेच त्यांचे गुण त्यांना राजकारणाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन गेले.

   वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात ‘गहुली’ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फुलसिंग नाईक व आईचे नाव होणुबाई असे होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अनेक मैल पायपीट करीत आई-वडिलांच्या महत्त्वाकांक्षेमुळे अतिशय जिद्दीने त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्याचे प्राथमिक शिक्षण, पोहरादेवी, उमरी, भोजली, बन्सी आदी गावात झाले. त्यांनी पुढे १९३८ साली नागपुरच्या मॉरिस महाविद्यालयातून बी.ए. ही पदवी संपादीत केली. १९४० मध्ये त्यांनी विधी शाखेची एल.एल.बी. ही पदवी प्राप्त केल्यानंतर सुरुवातीला काही काळ डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद, यवतमाळ, नागपूर येथे वकीली केली. नाईक यांच्या विचारांवर म. गांधी, प. नेहरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डेल कार्नेगी यांची प्रेरणा होती. १९४१ साली महात्मा गांधीजी यांच्या चले जाव आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसच्या विचारांची छाप पडली. आंदोलनादरम्यान त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय राजकारणाला सुरूवात केली.

   वसंतरावांनी आपली जीवननौका समाजरुपी महासागराकडे वळवली. १९५९ मध्ये गोरगरीबांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी पुसद येथे फुलसिंग नाईक महाविद्यालयाची स्थापना केली. प्रारंभी पुसद तालुक्यातील ‘आदर्श ग्राम’ चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नाईक १९४६ मध्ये पुसद नगरपरिषदेवर निवडून आले आणि नगराध्यक्षही झाले. आपल्या कार्यकुशलतेमुळे १९५२ मध्ये तत्कालीन मध्यप्रदेश विधानसभेवर पुसद मतदार संघातून निवडून आले आणि मध्यप्रदेश मंत्रिमंडळात महसूल खात्याचे मंत्री झाले. 

   १ नोव्हेंबर १९५६ रोजी यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक सहकार मंत्री झाले. १९५७ सारी त्यांना त्यांच्या आवडीचे कृषी खाते मिळाले. मिळालेल्या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन त्यांनी कृषिसिंचन, जलसंधारण, फलोत्पादन आणि सहकार या क्षेत्रांत भरीव कार्य केले. १ हे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर नाईक हे महसूल मंत्री झाले. याच काळात त्यांनी लोकशाही विकेंद्रीकरण अध्यक्ष म्हणूनही कार्य केले. सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा अहवाल त्यांनी तयार केला आणि महाराष्ट्रात ‘पंचायतराज’ ची मुहूर्तमेढ रोवली. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना व्यापक अधिकार मिळाले. त्यातूनच ग्रामीण नेतृत्व आकारास आले. ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यात आजही स्थानिक स्वराज्य संस्थांचा मोठा वाटा राहिलेला आहे.

  १९६३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे अकाली निधन झाल्यानंतर ५ डिसेंबर १९६३ रोजी वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या तिन्ही वेळच्या कारकिर्दीत महाराष्ट्र विधानमंडळाच्या माध्यमातून विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन लोककल्याणकारी, जनहिताचे अनेक निर्णय घेतले. या काळात जायकवाडी, उजनी, पेंच, धोम, अप्पर वर्धा अशी अनेक धरणे तर कोराडी, पारस, परळी, खापरखेडा, पोफळी, भुसावळ यांसारख्या विद्युत प्रकल्पांची उभारणी केली.

  ‘शेतकरी सुखी झाला तर अवघा देश सुखी होईल’ असे मानून शेती आणि मातीवर श्रध्दा असणा-या नाईक यांनी ‘शेतात पाणी आणि वीज‘ हेच सूत्र प्रमाण मानून अहोरात्र मेहनत घेऊन विकासाचे कार्य केले. राज्याचा औद्योगिक विकास झपाट्याने व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या कामाला गती दिली. काळ्या मातीचे हिरवे स्वप्न साकार करणारा हा महाराष्ट्राचा भुमिपूत्र म्हणत असे की, “मी मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीत बसलेलो असलो तरीदेखील मी शेतीच्या बांधावर बसलेलो आहे.!” शेती उत्पादनात वाढ, अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता, सहकारी संस्थांना बळकटी, साक्षरतेचा प्रसार, भटक्या – विमुक्तांसाठी स्वतंत्र आरक्षण, दुर्बल घटकांना सहाय्य, मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, मुंबईतील जून्या चाळीची पुनर्बाधणी, सिडको– हडको योजना, नवी मुंबई, नवीन औरंगाबादची निर्मिती, चार कृषी विद्यापीठांची स्थापना, कापूस एकाधिकार योजना, महाबीज योजना, आश्रम शाळा, महाराष्ट्रासाठी चार कृषी विद्यापीठांना मंजुरी, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, इ. त्यांच्या कारकीर्दीतील कामे उल्लेखनीय आहेत. हरितक्रांती, धवलक्रांती, यांसारख्या अनेक दूरगामी विकास योजनांची त्यांनी प्रभावी अंमलबजावणी केली. वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषिक्रांती घडवून आणली.

  वसंतरावांनी आपल्या कार्यकाळात सामाजिकदृष्ट्या पुरोगामी, औद्योगिकदृष्ट्या प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा महाराष्ट्राची उभारणी केली. कोयना धरण परिसरातील भूकंपाच्या वेळी अतिशय संवेदनशीलपणे यंत्रणा राबवून भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन केले. वसंतरावांच्या कार्यकाळात सतत तीन वर्षे दुष्काळ पडला. त्यांनी राज्यभर दुष्काळी दौरे करून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दिलासा दिला. हीच योजना पुढे देशपातळीवर स्विकारण्यात आली.

  केवळ अकरा – साडेअकरा वर्षे मुख्यमंत्री पदावर राहणं हा मुद्दा नाही. तर तो काळ असा होता की, अतिशय अस्थिरतेचा काळ होता. वसंतरावांनी महाराष्ट्राला अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एक स्थिरता प्राप्त करून दिली. वसंतराव नाईक हे एक चिंतनशील विचारवंत आणि भविष्यवेधी दूरदृष्टीचे राजनितीज्ञ होते. शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे, तसेच शेतकऱ्यांची लेकरं सुद्धा कलेक्टर झाले पाहिजेत. शेती ही उद्योगाची जननी आहे. शेती संपन्न झाली तरच लोकशाही संपन्न होईल. शेती मोडली तर लोकशाही मोडेल. शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. वंचित घटकाला अन्नाबरोबरच आता उद्यमशील शिक्षणाची सुद्धा तितकीच गरज आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावून नव्या युगातील क्षमतांबरोबर वैज्ञानिक दृष्टी जागृत करणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारी मूल्ये शिक्षणातून रुजायला हवीत असे ते म्हणत. माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे, धर्माच्या जातीच्या नावाखाली त्याला कमी लेखणे यासारखा दूसरा कोणताही असंस्कृतपणा नाही. असे उद्गार त्यांनी अस्पृश्यता निवारण शिबीर, नागपूर येथे काढले होते.

   वसंतराव नाईक यांच्या काळात अर्थतज्ज्ञांच्या अभ्यासातून असे निष्कर्ष निघाले होते की, काही काळ महाराष्ट्रामध्ये असा होऊन गेला, ज्यामध्ये शहरांपेक्षा ग्रामीण भागाच्या विकासाचा वेग कित्येक पटीने आधी होता. परिवर्तनाचा वेग अधिक होता. कालवे, विहीरी, धरणे या सगळ्यांमधून स्थायी मालमत्ता निर्माण झाली. ग्रामीण रस्ते, उपरस्ते तयार झाले. पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली गेली. यामध्ये कृषी उत्पादन ते बाजारपेठ हा सगळा प्रवास मोठ्या प्रमाणात सुरळीत झाला. रोजगार निर्मिती झाली.अन्नप्रक्रिया उद्योग होता, पूरक उद्योगधंदे निर्माण झाले, मग त्यासाठी कृषी विद्यापीठ आणि उद्योगधंदे यांची सांगड घालणं असेल. विज्ञान तंत्रज्ञान आणि शेती यांची सांगड घालणं असेल, कृषिविस्तार सेवेचा जास्तीत जास्त उपयोग करणे असेल यामध्ये अमुलाग्र बदल‌ घडून आले. त्यामध्ये वसंतराव नाईकांचा परिपक्व आणि समग्र असा दृष्टिकोन कारणीभूत होता. या स्थायी मालमत्ता निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आर्थिक परिवर्तन कसं घडून आलं याचा आकडेवारीनिशी अर्थतज्ज्ञांनी उल्लेख केलेला होता.दुर्दैवाची गोष्ट अशी की, रोजगार हमी योजना देशभर जोरात राबविली त्या तुलनेत पुढील काळात महाराष्ट्रामध्ये त्या योजनेकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते. जलयुक्त शिवार योजनेचाही बोजवारा उडालेला पाहायला मिळतो.

   १९७२ च्या दुष्काळाच्या संदर्भात शरद पवार यांनी एका भाषणात वसंतराव नाईक यांचा एक किस्सा सांगितला की, अन्य राज्यांमधून आपण धान्य आणतो. इतकी लोकं उपाशी मरत होती हे बघून नाईक साहेब अतिशय अस्वस्थ झाले. पुण्यातील सभेत त्यांनी असे म्हटले होते की, “येत्या दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करू शकलो नाही तर मी स्वतः पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर फाशी घेईल !” अशा प्रकारचं आश्वासन देणे, ते पूर्ण करून दाखवणे हे धाडसी पाऊल होते. त्या पुढील दोन वर्षांतच आपल्या महाराष्ट्राने ही स्वयंपूर्णता साध्य करून दाखवली.

   शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात सुद्धा नमुद केलेलं आहे, की कशा प्रकारे आपण विकासाची कामे करू शकतो, सहकारी क्षेत्र, उद्योगधंद्यासाठी असतील. बाहेरचे उद्योगधंदे आपल्याकडे यावेत, त्यांना सवलतीमध्ये जमीन देणं, वीज पुरवठा, बीज भांडवल पुरवठा करणे इत्यादी या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या वसंतराव नाईक यांच्या काळात झालेल्या आहेत. महाबीज बियाणे महामंडळ नाईक यांच्या काळात स्थापन झाले. परकीय गुंतवणुक आकर्षित करून घेण्यासाठी महाराष्ट्र हे राज्य सर्वाधिक पसंतीचे राज्य म्हणून ओळखले जाते. उद्योगपतींना महाराष्ट्राकडे आकर्षित करणं, देशी, विदेशी आणि राज्यातली गुंतवणूक आकर्षित करून घेणे हे महत्त्वाचं काम नाईक यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर झाले आहे. महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ, महाराष्ट्र लघु उद्योग औद्योगिक विकास महामंडळ (MSSIDC) राज्य औद्योगिक आणि गुंतवणूक महामंडळ (SICOM) अशा अनेक संस्था ज्या लघु उद्योगांना प्रोत्साहन देत होत्या, ‘सिकॉम’सारखी संस्था मोठे उद्योग, मध्यम उद्योग आणावेत यासाठी प्रयत्न करीत होती. यामागे वसंतराव नाईक यांच्या विकासाचा दृष्टिकोन कारणीभूत होता. त्यामुळेच महाराष्ट्र उद्योगधंद्यांमध्ये पुढे गेला आणि रोजगारप्रधान उद्योगधंदे सुद्धा त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाले. वसंतराव नाईकांच्या काळात 100 साखर कारखाने सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झाले. विमुक्त – भटक्यांसाठी वेगळ्या आरक्षणाची तरतूद करणं ही सुद्धा त्यांच्या काळातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रामध्ये बॅरिस्टर अंतुले, निलंगेकर, बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, पुन्हा शरद पवार हे मुख्यमंत्री झाले, परंतु कुठलीही राजकीय स्थिरता पाहावयास मिळत नव्हती. राजकीय स्थिरता असेल तर सगळी काम करता येऊ शकतात, मार्गी लागतात, लावता येऊ शकतात.

   आजचं सगळं वातावरण बघितलं तर मन उद्विग्न होतं. आरक्षणामध्ये संपूर्ण समाज एका विचित्र वादांमध्ये गुरफटलेला आहे. आरक्षणाचा वाद, राजकीय आरोप – प्रत्यारोप, एकमेकांवर भष्टाचाराचे आरोप गुन्हेगारीचे आरोप यामध्ये महाराष्ट्र कुठे चाललाय आज ? असा प्रश्न पडतो. महाराष्ट्रात शेती, रोजगार याचं काय चाललंय, महाराष्ट्रात कुठल्या नव्या संस्था उभं राहायला तयार आहेत ? महाराष्ट्राची प्रगती काय होत आहे काहीच कळत नाही. फक्त फोडाफोडीचे राजकारण, न्यायालयीन खटले, इडी, सीबीआय, घटनाबाह्य सरकार वगैरे सर्वत्र हीच चर्चा. सत्ताधारी पक्ष असो की, विरोधी पक्ष, काही नेते तर वारंवार अतिशय अज्ञानमूलक विधानं करताना दिसतात, कीव येते त्यांच्या बुद्धीची ! मराठा – ओबीसी आरक्षणाचा वाद सरकारने निःपक्षपणे मिटवायला हवा. केवळ निवडणुका जिंकणे आणि सत्ता उपभोगणे इतकाच उद्देश नसावा.

    शाहू, फुले, आंबेडकर यांच्यासारख्या थोर पुरुषांनी समाजसुधारणेसाठी अथक प्रयत्न केले. पण आज आपण त्यांच्या विचारांचे काय रक्षण करतोय? प्रगती, विकास, नवीन योजना, नवीन उपक्रम याची काहीही चर्चा होत नाही. हा प्रकल्प राबवा, हा प्रकल्प बंद करा, नवीन धोरणं आखा याबद्दल सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष यांच्यात सामंजस्याने कोणतीच चर्चा होताना दिसत नाही. वसंतराव नाईक यांच्या काळात तेव्हा विकासाच्या प्रश्नांवरतीच फक्त चर्चा व्हायची. शिक्षण, रोजगार, शेतीचे प्रश्न, जलसिंचन, घरांचा प्रश्न, बेकारी, भाववाढ अशा विविध विषयांवर चर्चा व्हायची. विविध विकास योजनांविषयीच चर्चा होत होती. त्यावेळेस नाईक हे विरोधकांचाही तेवढाच आदर, सन्मान करीत होते. आणि सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक यांचा हा आदर्श आजच्या राजकारण्यांनी घ्यायला हवा. सर्वसमावेशक, दूरदृष्टी असलेले नेतृत्व, व्यापक नेतृत्व, खंबीर नेतृत्व, राष्ट्रीय नेतृत्वामध्ये महत्वाची भूमिका निभावणारे नाईक साहेब हे राष्ट्रीय नेते होते हेही तितकेच खरे. पूर्णपणे आधुनिक दृष्टिकोन, दूरदृष्टी होती वसंतराव नाईक यांची !

   वसंतरावांनी महाराष्ट्रामध्ये विकासाचा रथ आणला. विकासाचा वसंतमळा फुलविला. त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द म्हणजे वसंत ऋतू होता तो ! महाराष्ट्राच्या राजकारणातील सुवर्णयुग होतं.       ‘हरितक्रांतीचे प्रणेते’ अशी जनमानसात ओळख असलेले वसंतराव नाईक १८ ऑगस्ट १९७९ रोजी अनंतात विलीन झाले. वसंतराव नाईक यांचे वरील कार्य पाहता असा मुख्यमंत्री होणे नाही !

जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन 

 प्रा. डॉ. सुभाष राठोड, पुणे

मा. अभ्यास मंडळ सदस्य,

पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पुणे


Comments

Popular posts from this blog

संत सेवालाल महाराज बंजारा-लमाण तांडा समृद्धी योजना :

गोरबंजारा समाजाची काशी - पोहरा देवी - डॉ. सुभाष राठोड

● समतेचे दीपस्तंभ : राजर्षी शाहू महाराज - डॉ. सुभाष राठोड